बरनी, जियाउद्दीन
बरनी, जियाउद्दीन : (?१२८४?-?१३५७?). भारतातील एक मुस्लिम इतिहासकार. त्याच्या जन्ममृत्यूच्या नेमक्या तारखा उपलब्ध नाहीत. दिल्लीचा सुलतान धियासुद्दीन बल्बन याच्या कारकीर्दीत (इ. स. १२६६-८७) आणि नंतरच्या खल्जी काळात (१२९०-१३२०) त्याच्या घराण्यातील लोकांना दरबारी अधिकारपदे लाभली होती. मुअयिद-अल्-मुल्क हे त्याचे वडील. त्याचे मामा मलिक-अला-अल्-मुल्क हे दिल्लीचे कोतवाल होते.